रत्नागिरी:- जिल्ह्यात अन्न प्रशासन रत्नागिरी यांच्यावतीने दुध व दुग्धजन्य पदार्थांचे एकूण 62 नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे नमुने 1 जून ते 30 जून 2023 या काळात घेण्यात आले आहेत. दरम्यान हे नमुने आता तपासणीसाठी मुंबईत लॅबमध्ये पाठविण्यात आलेले आहे. अलिकडच्या काळात दुधासोबतच दुग्धजन्य पदार्थांचा वापर अतोनात वाढला आहे. अशा स्वरुपाचे पदार्थ विक्रीला आणणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. मात्र आहारात वापर करण्यात येणारे पदार्थ हे आरोग्याच्या दृष्टिने किती सुरक्षित आहेत हे देखील महत्त्वाचे आहे. कारण मिठाई, विविध खाद्यपदार्थ, शेक यांत दुध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर होतो. मात्र सदोष असणारे पदार्थांचे सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
त्यामुळेच अन्न प्रशासनाच्या वतीने राज्याचे (अन्न) आयुक्त अभिमन्यू काळे तसेच, कोकण विभागाचे (अन्न) चे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे नमुने जिल्ह्यातील विविध भागातून घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात फॉर्मल आणि सर्व्हिलन्स या दोन माध्यमातून हे नमुने घेण्यात आले. शहराजनीक नाचणे येथे 2 ठिकाणी दुधाचे 4 आणि दुग्धजन्य पदार्थांचे 5 असे मिळून 9 नमुने गोळा करण्यात आले आहेत. या दुग्धजन्य पदार्थांमध्ये दही, ताक, श्रीखंड , चिझ यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.