जाकादेवी/ वार्ताहर:- रत्नागिरी तालुक्यातील श्री लक्ष्मीकेशव विद्यालय कसोप – फणसोप येथे कै. ग. स. तथा गणपत अण्णा स्मृतीदिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला.
या समारंभासाठी जीवन विद्यामंडळ, कसोप- फणसोपचे अध्यक्ष श्री कमलाकर तथा बबनकाका साळवी, सचिव श्री. रितेश साळवी, सदस्य श्री. महेश साळवी, शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रकाश साळवी, सदस्य श्री. धनंजय जोशी, पालक सौ. साळवी, सौ. तोसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा राजेशिर्के, शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. चौगले, सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते माता सरस्वती व कै. ग.स. साळवी यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यांनतर शाळेतील विद्यार्थीनिनी गीतातून ईशस्तवन व स्वागत केले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेशिर्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंतर बक्षीस रूपाने भेट देण्यासाठी ठेव ठेवलेल्या देणगीदारांची नावे वाचून त्यांना धन्यवाद दिले. इ. पहिली ते दहावीतील प्रथम व द्वितीय क्रमांकाना बक्षीस देण्यात आले.
शाळेचे NMMS व चित्रकला ग्रेड परीक्षा यामधील यश पाहून फणसोपचे कॅप्टन दीपक साळवी व कमिशनर सुभाष साळवी या बंधूंनी वरील परीक्षांमधील गुणवंतांचा सत्कार करण्यासाठी पाठवलेली भेटवस्तू विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री. झोरे, श्री. चौगले, सौ. मालवणकर, श्री. भिडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कलाशिक्षक श्री. पवार यांचाही सत्कार करण्यात आला.
नंतर रत्नागिरी जिल्हा परिषद, प्राथमिक विभागामार्फत घेण्यात आलेल्या शोध कलारत्नांचा चित्रकला स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त कु. चैतन्य तिवरेकर व चतुर्थ क्रमांक प्राप्त कु. स्वयम् मुरकर यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर इ. दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी कु. सुजल तोसकर याने मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्याने अभ्यास केल्याने यश नक्की मिळते असे सांगितले.
श्री. धनंजय जोशी यांनी सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचे आवाहन केले. श्री. रितेश साळवी यांनी स्पर्धा परीक्षांचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. श्री. प्रकाश साळवी यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचं सांगितलं. श्री. कमलाकर साळवी यांनी विद्यार्थ्यांपुढे शाळा स्थापनेचा इतिहास उलगडला. सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमा जोशी यांनी केले तर श्री. पोंक्षे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.