रत्नागिरी:- येथील भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये नव्या वास्तूचे बांधकाम सुरू झाले आहे. तिची पायाभरणी देणगीदार रमेश कीर आणि नमिता कीर दांपत्याने केले.
पायाभरणीनंतर जुन्या कीर सभागृहाच्या जागेवर शिलान्यास समारंभ करण्यात आला. त्यानंतर कॅ. सुभाषचंद्र सभागृहात छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यावेळी कीर म्हणाले, भारत शिक्षण मंडळात अच्युतराव, शंकररावांचे संस्कार खोलवर रुजले आहेत. या दोघांबद्दल मला खूप आदर आहे. वैचारिक मुळे भक्कम आहेत. तीच आज काळाची गरज आहे. ध्येयाने प्रेरित होणारी ही संस्था आहे. भारत शिक्षण मंडळाला सुमारे सव्वाशे वर्षांची मोठी परंपरा आहे. तसेच बहुजनांच्या शिक्षणाचा पायंडा संस्थेने आजही सुरू ठेवला आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. रत्नागिरीमध्ये आता बऱ्यापैकी शैक्षणिक स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे अधिक मोठे होण्यासाठी खूप संधी आहे.
संस्थेच्या कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी प्रास्ताविकात संस्थेची ध्येयधोरणे सांगताना नवीन इमारतीबद्दल माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी म्हणाले, काळानुरूप इमारत बांधणार आहोत. दोन-तीन वर्षांत इमारत पूर्ण होईल. समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देत आहोत, याचे समाधान वाटते. त्यामुळे मुले हक्काने येथे येतात.
व्यासपीठावर भारत शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये, कार्यवाह सुनील तथा दादा वणजू, मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे उपस्थित होते. पालिकेचे बांधकाम अभियंता श्री. जाधव, इमारतीचे बांधकाम करणारे मिलिंद यादव, ठेकेदार आदींचा सन्मान करण्यात आला.