सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला आता पुन्हा महागाईची झळ बसणार आहे. तेल कंपन्यांनी एलपीजीच्या व्यावसायीक सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. तब्बल सात रुपयांनी ही वाढ केली असून खाद्य पदार्थांचे दर देखील यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करत असतात. १ जून रोजीही व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ८३ रुपयांनी कमी झाली होती. यामुळे आता दरवाढ होणार नाही यामुळे सर्व सामान्य सुखावले असतांना आज ४ जुलै रोजी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. तब्बल ७ रुपयांनी ही दर वाढ केली आहे.
यामुळे आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० इतकी झाली आहे. सुदैवाने तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल केला नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत या पूर्वी एप्रिल, मे आणि जूनमध्ये कपात करण्यात आली होती. यानंतर मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यानंतर आज ७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.