चिपळूण:- राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजित पवार यांना काळजावर दगड ठेवून पाठिंबा देण्याचे ठरविले, अशी माहिती चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंड करून पक्षाच्या काही आमदारांना बरोबर घेत शिंदे सरकारला पाठिंबा दिला आणि ते उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. हे वृत्त जिल्ह्यात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव शेखर निकम चिपळूणचे आमदार आहेत. कोकणात रायगडमधून आदिती तटकरे आणि चिपळूणमधून निकम असे दोनच आमदार असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता होती. त्यात आदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाल्याने आमदार निकम यांची भूमिका काय, याबाबत उत्सुकता लागून राहिली होती.
याबाबत श्री. निकम म्हणाले, पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. तोपर्यंत कोणाला काहीच कल्पना नव्हती. प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबाबत ही बैठक असेल, असे वाटले होते. त्यानिमित्ताने सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. मात्र त्यानंतर पुढचा सर्व प्रकार समोर आला. यावेळी मात्र आपण काळजावर दगड ठेवून अजित पवारांना साथ देण्याचे ठरविले आहे. मागच्या वेळी मी विरोधी भूमिका मांडली आणि सुदैवाने त्यावेळची राजकीय समीकरणे जुळली नाहीत आणि अजित पवार पुन्हा आमच्यात राहिले. मात्र त्यावेळेचा रोष दूर करण्यासाठी आता आम्ही दादांबरोबरच राहाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. आता त्यांना तोंडावर पाडायचे नाही, असे ठरविले आहे. शेवटी राज्यातले नेते म्हणून अजित पवारच आहेत. आता ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कसे जाणार? कदाचित उद्या ते मुख्यमंत्रीही होतील. त्यामुळे त्यांच्याबरोबरच राहण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.