रत्नागिरी:- जिल्ह्यात पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे भात रोप लावण्यांची कामे सुरू झाली आहेत. मागील तीन दिवसांत वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे जिल्ह्यात सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले.
त्यामध्ये घरांवर झाड पडल्याचे प्रकार सर्वाधिक आहेत. रविवारी (ता. २) जिल्ह्यात थांबून सरी पडत आहेत.
गेले दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असून रस्ते खचल्याने वाहतुकीलाही फटका बसला. मंडणगड तालुक्यातील कुडुक बुद्रुक येथील सचिन तांबे आणि भारती तांबे यांच्या घराचे नुकसान झाले.
दापोलीतील हर्णै, शिरसोली, बोडिवली, दाभोळे येथे पडझडीमुळे नुकसान झाले. खेडमधील मुंबके, सवेणी, सर्वणी येथे घरांचे नुकसान झाले. चिपळूणमध्ये पालशेत, मासू येथे नुकसानीच्या घटना घडल्या.
गुहागर-चिपळूण-कराड मार्गावर ट्रकचा टायर फुटल्यामुळे रविवारी (ता. २) पहाटे ५ पासून एकेरी वाहतूक सुरू होती.
८ नंतर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली. संगमेश्वर नावडी, भडकंबा-बेर्डेवाडीत पावसाने विहीर खचली, जयगडमध्ये घरांचे नुकसान झाले.
रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ५२.५६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगडमध्ये ३० मिमी, दापोली ६६, खेड ६१, खेड ६१, गुहागर २२, चिपळूण ७५, संगमेश्वर ६४, रत्नागिरी २४, लांजा ७७, राजापूरमध्ये ५४ मिमी नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ५७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत ७८२ मिमी पाऊस झाला होता.