मुंबई:- अजित पवारांनी वेगळी चूल मांडत महाविकास आघाडी अर्थात मविआला जोराचा झटका दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
स्वबळावर यापुढील निवडणुका लढविण्याचा निर्णय उद्धव हे जाहीर करु शकतात. तशी जोरदार चर्चा आहे.
रविवारी दुपारी झालेल्या महाभुकंपाने अनेकांना हादरे बसले आहेत. त्यातल्या त्यात या घटनेमुळे महाविकास आघाडीचे तुकडे झाले आहेत. मविआ स्थापन करण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या राष्ट्रवादीतच उभी फूट पडल्याने मविआ आता कायम राहणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात उद्धव ठाकरेंनी मविआला सोडचिठ्ठी देण्याचे ठरविल्याची चर्चा आहे. राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे, कॉंग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. यातच आता महाविकास आघाडी टिकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या एका खासदाराने याबाबत विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली. विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार यांनी बंड केले आणि शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले. आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले असून महाविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यासंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
स्वबळाची चर्चा
शिवसेना ठाकरे गटातील आमदारांची मुंबईत बैठक होणार असून महाविकास आघाडी आणि पुढील वाटचालीचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडून येणाऱ्या निवडणुकात स्वबळावर लढेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.