रत्नागिरी: फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची अकाऊंट हॅक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. त्यांना प्रसंगी बदनाम केले जाते. अशा हॅकर्सनी कोणाचेही अकाऊंट हॅक केल्यास ते अकाऊंट पूर्ववत करून देण्याचे काम रत्नागिरीतील अक्षय फाटक हे करत आहेत. आतापर्यंत त्यांनी अशी १४९ अकाऊंट पूर्ववत करून लोकांची होणारी फसवणूक टळली आहे. मात्र असे चांगले काम करत असताना धोका पत्करावा लागतो. हॅकर्सविरोधात काम करणाऱ्या अक्षय फाटक या तरूणाला हॅकर्सकडून धमक्या आल्याचा प्रकार समोर आला आह़े. त्याच्या या कामामुळे अनेकांना दिलासा मिळाला होत़ा. दरम्यान हॅकर्सकडून येणाऱ्या धमक्यांसंदर्भात अक्षय यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े.
गेल्या काही वर्षात भारतीय समाजाचा समाज माध्यमांवरील वावर वाढला आह़े. व्यक्त होण्याची इच्छा, आवड आणि गरज ही या समाज माध्यमाचा एक भाग बनली आणि सगळेजण बेसुमारपणे यावरून व्यक्त होऊ लागले. याचाच फायदा हॅकर्सकडून घेतला जात आह़े फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी वैयक्तिक अकाउंट काही पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी हॅक होवू लागले आहेत़. याचा मोठा मनस्ताप सर्वसामान्यांना सहन करावा लागत़ो. यासाठीच रत्नागिरीतील अक्षय फाटक या तरूणाने पुढाकार घेत १४९ हॅक झालेले अकाउंट रिकव्हर करण्यात यश मिळवले.
अक्षय हे काम करत असलेल्या कार्यामुळे हॅकर्सची मेहनत पाण्यात जात आह़े. यासाठीच अक्षय यांना काही हॅकर्सकडून धमक्या दिल्या जात असल्याची बाब समोर आली. ज्याने ते हॅक केलेले असते, त्याचा हेतू साध्य होत नसल्यामुळे हाताश झालेल्या हॅकर्सकडून आता अक्षय याला फोन व मेसेज करून धमकावण्याचा प्रकार सुरू केला आह़े. आजपर्यंत अशाच विषयावरून अक्षय यांना 4 ते 5 वेळा धमक्या देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अक्षय याने तातडीने रत्नागिरी शहर पोलिसात धमकी देणाऱ्या अज्ञात हॅकर्सविरोधात तक्रार दाखल केली आह़े. पोलिसांकडून अक्षय यांना पुन्हा अशा प्रकारे धमक्या आल्यास कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सांगण्यात आले. रत्नागिरी पोलिस सायबर सेल धमक्या देणाऱ्या हॅकर्सचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. जनसामान्यासांठी चांगले काम करणाऱ्या अक्षय यांना धमक्या देणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आह़े.