नव्या संसद भवनात चालणार 23 दिवस कामकाज
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आगामी 20 जुलै रोजी सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. एकंदर 23 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 17 बैठकी होणार आहेत.
यादरम्यान सर्व पक्षांनी कामकाजात सहभागी व्हावे असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलेय.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्यावर विधेयक मांडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय. दिल्लीतील केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचे पडसाद देखील या अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणावर उपराज्यपालांना अधिकार देणाऱ्या विधेयकाबाबत केंद्र सरकारला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशभरात फिरुन भाजपविरोधी पक्षांच्या भेटी घेत आहेत आणि या प्रकरणी सर्व भाजपविरोधी पक्षांचा पाठिंबा घेत आहेत. काँग्रेसने मात्र अद्याप आपलं मत स्पष्ट केलेले नाही, कारण अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या विधेयकालाही विरोध करण्यास सांगितले आहे.
यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची खास गोष्ट म्हणजे नवीन संसद भवनात होणारे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. नवे संसद भवन पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 28 मे रोजी नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन केले होते. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टने या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे बांधकाम केले आहे. दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या इमारतीत प्रत्येक मंत्र्याला वेगळं कार्यालय मिळणार आहे. आधीच्या संसद भवन इमारतीत केवळ 30 कॅबिनेट मंत्र्यांना आणि काही राज्यमंत्र्यांना कार्यालय मिळाले होते. याशिवाय नवीन संसद भवनात प्रत्येक पक्षाला वेगळे कार्यालय दिले जाणार आहे.