नवीन फोन घेतल्यानंतर जुन्या फोनमधील डेटा त्यात घेणं हे अत्यंत किचकट काम असतं. त्यातच व्हॉट्सअॅपचे जुन्या फोनमधील मेसेज दुसरीकडे घेणं म्हणजे आणखी कटकट. मात्र आता व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरमुळे ही प्रक्रिया अगदी सोपी होणार आहे.
आता एका फोनमधील चॅट्स दुसऱ्या फोनमध्ये घेण्यासाठी केवळ क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि अधिक सुरक्षित होणार असल्याची माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे. व्हॉट्सअॅप हे मेसेंजिंग अॅप मेटाच्या मालकीचं आहे. (WhatsApp Chat Transfer)
व्हॉट्सअॅपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये हे फीचर कसं काम करेल याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी अन्य कुठल्या अॅपची गरज भासणार नाही, आणि तुमचा डेटा अधिक सुरक्षित राहील असं कंपनीने म्हटलं आहे.
असा करा डेटा ट्रान्सफर
यासाठी तुमच्या दोन्ही फोनमध्ये सारखीच ऑपरेटिंग सिस्टीम (अँड्रॉईड किंवा अॅपल) असणं गरजेचं आहे. तसेच, दोन्ही फोन एकाच वायफाय नेटवर्कवर असणं आवश्यक आहे.
यानंतर तुम्हाला जुन्या फोनवर व्हॉट्सअॅप उघडून सेटिंग्समध्ये जायचं आहे. त्यामध्ये चॅट्स हा पर्याय निवडून पुढे चॅट ट्रान्सफर यावर यचं आहे. यानंतर एक क्यूआर कोड दिसेल. आता तुमच्या नवीन फोनमध्ये हा क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. यानंतर जुन्या फोनमधील सर्व चॅट डेटा नवीन फोनमध्ये ट्रान्सफर होईल.
डेटा ट्रान्सफरच्या क्लाऊड किंवा अन्य पद्धतींपेक्षा ही पद्धत अगदी सोपी आणि सुरक्षित असल्यामुळे यूजर्सना मोठा फायदा होणार आहे.