नुकसानग्रस्ताना तातडीने मदतीची गरज
असाह्य विधवा महिलेला शासनाकडून मदत मिळणार का?
रत्नागिरी:- शनिवारी रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील उक्षी बनाची मधली वाडी येथे चिऱ्याची संरक्षण भिंत घरावर कोसळून दोन घरांचे लाखोंचे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, संजय रावणंग यांच्या घरा शेजारी असलेली चिऱ्याची संरक्षण भिंत अचानक कोसळली. यामध्ये संजय रावणंग यांच्या घराचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेजारी राहणाऱ्या प्रतिक्षा रावणंग यांच्या घरावरही भिंत कोसळली. यामध्ये प्रतिक्षा रावणंग यांच्या घराला तडे गेले असून मोठ्या प्रमाणात भिंतीचे चिरे निखळले आहेत.ही भिंत केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे.एकच भिंत कोसळून दोन घरांचे नुकसान झाले आहे.
प्रतिक्षा रावणंग या विधवा असून आपल्या लहान मुलीसोबत राहतात. त्यांच्या घरात कर्ते कमावते कोणीच नाही. झालेले नुकसान कसे भरून काढायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अथवा त्यांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करावी अशी मागणी होत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच विभागाचे मंडळ अधिकारी पाटील, उक्षी गावच्या तलाठी सौ.स्वाती लोहार,पोलीस पाटील अनिल जाधव, माजी सरपंच मिलिंद खानविलकर, माजी उप सरपंच मंगेश नागवेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तसेच पंचनामा केला. दोन्ही घरांचे मिळून सुमारे पाच ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
शासनाकडून आपल्याला मदत मिळावी जेणेकरून कोसळलेल्या भिंती पुन्हा उभ्या करता येतील अशी अपेक्षा दोन्ही कुटुंबांनी ‘ग्रामीण वार्ता’कडे व्यक्त केली आहे.