रत्नागिरी: शिक्षक बदल्यांच्या सहाव्या टप्प्यातील 64 शिक्षकांना शनिवारी समूपदेशनासाठी जि. प. भवनात बोलावण्यात आले होते. मात्र सायंकाळपर्यंत त्यांना ताटकळत ठेवून कामगिरीवर शाळा देण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी प्रशासनाला धारेवर धरल्याने गदारोळ उडाला होता.
रत्नागिरी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरून गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरूच आहे. आंतरजिल्हा बदल्यांवरून रणकंदन माजले. पण आता जिल्हांतर्गंत शिक्षक बदल्यांतील गोंधळ अजूनही थांबलेला नाही. सहाव्या टप्प्यात झालेल्या बदल्या पुन्हा वादात आल्या आहेत. या टप्प्यात बदली झालेल्या 64 शिक्षकांना शनिवारी जि.प. पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार शनिवारी समूपदेशनासाठी जि.प. भवनात बोलावण्यात आले होते. यादिवशी दुपारी 1 वा. दाखल झालेल्या शिक्षकांना मात्र सायंकाळपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले होते. अखेर सायंकाळी 6 वाजता तुम्हाला कामगिरीवर शाळा देण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.पण ही बाब या शिक्षकांना मान्य नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला कायमस्वरुपी शाळा देण्यात यावी. प्रशासनाच्या त्या भूमिकेवरून 64 शिक्षक संतापले. यावरून प्रशासन व शिक्षक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे शिक्षक जि.प. भवनात ठाण मांडून राहिले होते. यामुळे वातावरण तणावाचे बनले होते.
काही शिक्षकांचं म्हणणं आहे की, आमचं वय 50 पेक्षा जास्त असल्याने त्याच ठिकाणी ठेवावे, या मागणीसाठी 44 शिक्षक न्यायालयात गेले आहेत. असे असताना आता सहाव्या टप्प्याच्या बदल्या निर्माण झालेल्या गोंधळाने प्रशासन गोंधळून गेले आहे.