खेड:- तालुक्यातील लोटे-पटवर्धन येथील हॉटेल सद्गुरूसमोर खवले मांजर तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यातील तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली, तर एकाला एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिलिंद वसंत सावंत, मीना मोहन कोटिया, राजाराम वामन पगारे, श्रीकांत तानाजी भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे, तर योगेश युवराज निकम यांची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
लोटे-पटवर्धन येथे 2 अज्ञात व्यक्ती खवले मांजराच्या खवल्याची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चिपळूण व दापोली वनविभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले होते. खवले मांजराच्या तस्करी प्रकरणा छडा लावण्यासाठी चिपळूण वनविभागाने तपासाला गती दिली असताना अन्य तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार एकास मुंब्रा-ठाणे येथून तर अन्य दोघांना बिजघर-कातकरवाडी येथून जेरबंद करण्यात आले होते.