विजेच्या आवाजाने झाली बधीर
रत्नागिरीतील सैतवडे येथे घरावर वीज कोसळून एक महिला बधीर झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. दिप्ती काताळे (42, सैतवडे) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसात सैतवडे येथील काताळे यांच्या घरावर वीज कोसळली. घरावर वीज कोसळताच शॉर्टसर्कीट झाले. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले. परंतु सुदैवाने यामध्ये दिप्ती काताळे बचावल्या. मात्र वीजेच्या आवाजाने काताळे या कर्णबधीर झाल्या. त्यांना ऐकू येत नाही. बोलताना त्रास होत आहे. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या मेंदूपर्यंत याची झळ पोहोचल्याने बधीरता अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.