रविवारी सकाळपासून सारा कुणाच्याही फोनला प्रतिसाद देत नव्हती. तिच्या फ्लॅटची भाड्याची रक्कम थकलेली असल्यामुळे सोमवारी एजंट पुन्हा तिच्या घरी गेला, तेव्हा त्याला संशय आला.चित्रपटसृष्टीतील २६ वर्षीय मेकअप आर्टिस्ट सारा यंथन राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. खार दांडा येथे भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये मंगळवारी रात्री तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत सापडला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या साराच्या हातावर जखमा आहेत. कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.मूळची नागालॅंड येथील रहिवासी असलेली सारा मुंबईत चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेबसीरिजमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. बँकेत काम करणाऱ्या एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. तिचा प्रियकर लग्नासाठी तिच्यामागे तगादा लावून असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.रविवारी सकाळपासून सारा कुणाच्याही फोनला प्रतिसाद देत नव्हती. तिच्या फ्लॅटची भाड्याची रक्कम थकलेली असल्यामुळे सोमवारी एजंट पुन्हा तिच्या घरी गेला, तेव्हा त्याला संशय आला. त्याने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.नागालँडमध्ये राहणारी साराची आई रोझी यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. त्या मंगळवारी मुंबईत आल्या. खार पोलिसांनी मंगळवारी दुपारी कूपर हॉस्पिटलमध्ये साराचे पोस्टमॉर्टम केले आणि मृतदेह तिच्या आईकडे सोपवला.