संगमेश्वर:- डिंगणी येथील लाईटचा लोखंडी पोल जीर्ण झाला असून वारंवार तक्रारी करूनही त्यासंदर्भात कार्यवाही होत नसलेने शिवसेना डिंगणी शाखेच्यावतीने उपकार्यकारी अभियंता संगमेश्वर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. महावितरण प्रशासनाकडे या संदर्भात अनेक वेळा तक्रारी व माहिती दिली असतानाही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
याबाबत आम्ही वेळोवेळी रत्नागिरीतील मुख्य अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करत असून त्या संदर्भात तुम्हाला लेखी स्वरूपाची माहिती द्यायला आम्ही तयार आहेत, असे संगमेश्वर अभियंत्यांनी यावेळी सांगितले. मात्र, याबाबत आपण काहीही माहिती दिली तरी, आता तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा लोकांच्या जीवाला धोका आहे. जीर्ण अवस्थेतील पोल हे लोकवस्तीत असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, असे निवेदनकर्त्यानी सांगितले. सदर पोल दुरुस्ती करून घ्यावा अन्यथा हे अंतिम निवेदन समजून लोकांच्या भल्यासाठी शिवसेना डिंगणी आपल्या कार्यालयासमोर धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल.
याबाबतचे निवेदन देताना संगमेश्वर युवासेना उपतालुका अधिकारी सुधीर चाळके, शाखा प्रमुख विशाल कदम, महिला शाखा प्रमुख समीरा खान, भगवान खाडे, योगेश खाडे, अनिल कदम, उदय जोगळे, रेहबाज जुवले, प्रकाश कदम आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.