रत्नागिरी : जिंदल कंपनीच्या माध्यमातून नांदिवडे येथे उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनल विरोधात प्रदूषण विरोधी संघर्ष समिती नांदिवडे यांची तहसीलदार तसेच जिंदल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी भेट घेतली.
आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी संवाद साधला. मात्र, लेखी पत्र दिल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले.
गॅस टर्मिनलच्या विरोधात प्रदूषण विरोधी संघर्ष समिती नांदिवडे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलनात उतरली आहे. येथील गॅस टर्मिनलला ग्रामस्थांचा विरोध नाही तर येथे सुरू असलेले या प्रकल्पाचे कामकाज लोकवस्तीतून हटवण्यात यावे, तोपर्यंत ग्रामस्थांचे हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मंगळवारी दुसर्या दिवशी या आंदोलनकर्त्यांची तहसिलदार राजाराम म्हात्रे आणि जिंदल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी ऑपरेशन हेड समीर गायकवाड यांनी भेट घेतली. पण आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून याबाबत निर्णय दिला जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना कंपनीमार्फत देण्यात आल्याचे संघर्ष समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
नांदिवडे येथील ग्रामस्थांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी 14 एप्रिलपासून जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल प्रकल्पाच्या विरोधात हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पार्टी, ठाकरे शिवसेना रत्नागिरी यांनी समर्थन दर्शवले आहे. प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडे अध्यक्ष शंकर घाणेकर, प्रथमेश गावणकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील प्रमुख मान्यवर, गावकर व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
नांदिवडे अंबूवाडी फाटा या ठिकाणी गॅस टर्मिनल उभारण्याचे काम जिंदल उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरु आहे. त्या ठिकाणी काम करीत असणार्या ठेकेदार व कंपनीच्या संबंधीत अधिकारी वर्गाकडून माहिती मिळाल्यानंतर कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी रत्नागिरी, तहसिलदार रत्नागिरी यांना गॅस टर्मिनलची जागा स्थलांतरित करणेबाबत निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलन सुरु करण्यात आले. कंपनी व प्रशासन टर्मिनलची जागा अन्यत्र हलवत नाहीत तोपयर्र्त आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
जिंदलच्या गॅस टर्मिनल विरोधातील आंदोलन दुसऱ्याही दिवशी सुरूच
