पावसाळ्यात प्रवाशांना करावी लागणार कसरत
संगमेश्वर-संगमेश्वर तालुक्यातील आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र.४४ या मार्गावरील कुचांबे गडनदी पुल ते धनगराचे पाणी कि.मी १७ ते कि.मी २२ मधील रस्त्याची दुरावस्था झाली असून या मार्गावर या वर्षीच्या पावसाळ्यात प्रवाशांना प्रवास करत असताना कसरत करावी लागणार आहे.
या मार्गावरील गडनदी पुलाची दुरावस्था झाली असून या कामासाठी सन २०१७ च्या विशेष देखभाल दुरुस्ती अंतर्गत तरतूद करण्यात आली होती मात्र अपरीहार्य कारणास्तव काम न झाल्याने येथील पुलाची स्थिती गंभीर बनली आहे. तर पुलापासून पुढील कदमवाडी, निकमवाडी, शिर्केवाडी फाटा, धनगराचे पाणी आदी ठिकाणी रस्त्याची दुरवस्था प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. गडनदी धरण ते धनगराचे पाणी या टप्प्यातील काम सन २०१७ ला मंजूर झाले होते त्यानंतरच्या काळात या ठिकाणी अपेक्षित काम झाले नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत जमीन खचण्याचा प्रकार घडत असल्याने या ठिकाणच्या रस्त्याच्या डागडुजीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे स्थानिक विकासावर परीणाम होत असून निधी वाटपात त्याचा परीणाम दिसू लागला आहे.आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी या रस्त्याच्या कि.मी १७ ते २२ मधील दुरुस्तीच्या कामासाठी मार्च २०२५ च्या अर्थसंकलपात चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी ९० लाख रुपये निधीची मागणी केली होती मात्र राज्य सरकारच्या सध्याच्या योजना आणि धोरणामुळे निधीची उपलब्धता होवू शकली नाही. याचा फटका आता स्थानिक जनतेला बसत आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागावे अशी विनंती स्थानिकांची आहे.