चिपळूण (प्रतिनिधी) : नवीन संच मान्यता निकषामुळे कोकण आणि दुर्गम भागातील शाळांना मोठा फटका बसणार असून याबाबत शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी चर्चा झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केले. ते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ व रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित ६३ व्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनात बोलत होते.
यावेळी अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुनील पंडित तर स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम उपस्थित होते. ना. सामंत पुढे म्हणाले की, टप्पा अनुदान, जुनी पेन्शन योजना यासारख्या शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर सरकार काम करत असून यातूनही मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्यमंत्री गृह, महसूल ,ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन ना. योगेश कदम यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात कोकण भूमीत सर्वांचे स्वागत करून आपण संस्थाचालक असल्याने शाळांच्या समस्या आपल्याला माहीत असून त्या समस्या सोडवण्यासाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या पाठीशी ठामपणे राहू तसेच नवीन संच मान्यता निकषामुळे कोणतीही शाळा बंद पडणार नाही,याची खबरदारी घेऊ याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निश्चितपणे यासाठी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केले. यावेळी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ५२ मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अधिवेशनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांनी विक्रमी उपस्थिती नोंदवली. कोकण कृषी विद्यापीठाचे सर विश्वेश्वरैया सभागृह खचाखच भरलेले होते. महाराष्ट्रातील जवळपास दोन हजार मुख्याध्यापक या अधिवेशनासाठी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने (सोलापूर), कार्याध्यक्ष आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव नंदकुमार सागर (पुणे), उपाध्यक्ष सचिन नलवडे (सातारा), डॉ. डी. एस. घुगरे (कोल्हापूर), आर.व्ही.पाटील (धुळे), मार्गदर्शक सुभाष माने (सोलापूर), अरुण थोरात( पुणे), जे. के. पाटील (जळगाव), कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पुणे शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, प्रवक्ता प्रसाद गायकवाड, कोषाध्यक्ष संदेश राऊत, सहसंपादक रमेश तरवडेकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर व सर्व पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्याध्यापक संघ व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघ, दापोली तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, राज्य महामंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.