मध्यरात्री बौद्ध महिलांसह ग्रामस्थ आक्रमक; ठोस कारवाईची मागणी
रत्नागिरी/ प्रतिनिधी:-तालुक्यातील हातखंबा येथे बौध्दवाडीच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीदिवशी रस्त्यालगत लावलेला बॅनर एका मुलाने फाडल्याची घटना घडली. ही घटना 14 एप्रिल 2025 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याने मध्यरात्री तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जयंतीचा बॅनर फाडल्याची खबर बौध्दवाडीमध्ये कळताच ग्रामस्थ मध्यरात्री एकवटले होते.
या घटनेची माहिती हातखंबाच्या पोलीस पाटील सनगरे यांना मिळताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत तात्काळ घडलेल्या प्रकाराची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यादव हे घटनास्थळी दाखल होऊन पोलीस फौजफाटा देखील घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. यावेळी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून संताप व्यक्त करण्यात येत होता. संतप्त जमावाकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ या भागात बसवलेले सीसीटीव्ही तपासण्याचे काम हाती घेतले.
दुसरीकडून जमावाला शांत करण्याचे काम देखील पोलीसांकडून सुरू होते. अती संवेदनशील प्रकरण असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी माईनकर ही मध्यरात्री हातखंबा येथे दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर एक मुलगा रस्त्यावरून चालत जात असताना बॅनर फाडत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. मात्र या मुलाने जाणीवपूर्वक कृत्य केले आहे का? त्याला कृत्य करणाऱ्यास कोणी इतर व्यक्तीने सांगितले आहे का? तो रात्री साडेदहा वाजता बाहेर कोणत्या करणासाठी पडला? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. पोलिसांनी त्या मुलाच्या पालकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते.