महेंद्र कासेकर उपाध्यक्ष तर सचिव म्हणून सुभाष कदम यांची निवड
चिपळूण, (प्रतिनिधी) : येथील चिपळूण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार मुझफ्फर खान यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून महेंद्र कासेकर, सचिव म्हणून सुभाष कदम आणि खजिनदार म्हणून समीर जाधव यांची निवड करण्यात आली.
प्रिंट मिडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासंदर्भात तसेच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांकरिता विधायक कार्य करण्यासाठी चिपळूणमधील विविध दैनिकांच्या पत्रकारांनी एकत्र येऊन चिपळूण पत्रकार संघाची स्थापन केला आहे. संपूर्णपणे कायदेशीर आणि नोंदणीकृत अशी ही संघटना असून, संघटनेला शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. शासन मान्यता असलेल्या दैनिकांत काम करणारे सर्व श्रमिक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत. पत्रकारांच्या विविध समस्या, सोडवणे, त्यांच्याकरिता आरोग्य, विमा संरक्षण, विविध संधी, तज्ज्ञांचे अभ्यासवर्ग अशा अनेकविध बाबींवर हा पत्रकार संघ कार्य करतो. येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहावर आज सकाळी या पत्रकार संघाची वार्षिक बैठक झाली.
या बैठकीत मावळते अध्यक्ष नागेश पाटील यांनी वर्षभर केलेल्या कामाचा आढावा दिला. संघटनेच्या जमाखर्चाचा तपशील सांगितला. पत्रकार संघाच्या माध्यमातून आतापर्यंत राबवण्यात आलेल्या सामाजिक आणि विधायक उपक्रमामुळे आपल्या पत्रकार संघाची वेगळी ओळख समाजात निर्माण झाली आहे. असे पत्रकार संदिप बांद्रे यांनी यावेळी सांगितले.
प्रिंट मिडीयामध्ये काम करणारे आपण सर्वजण एका कुटूंबासारखे आहोत. यापुढेही आपण सर्वजण एकत्र राहूया. प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी साथ देऊया आणि समाजाला अपेक्षित असलेली पत्रकारिता करूया असे पत्रकार राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
पत्रकार संघटनेच्या माध्यमातून यापुढे समाजाला अपेक्षित असलेले उपक्रम राबण्याची अपेक्षा पत्रकार समीर जाधव यांनी व्यक्त केली. चिपळूण शहराच्या विकासाला दिशा देता येईल. यासाठी आपले लिखाण असावे. तसेच संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताचे रक्षण करता येईल. असे काम करण्याची अपेक्षा राजेश जाधव यांनी व्यक्त केली.
त्यानंतर नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणी पुढील एक वर्षासाठी असणार आहे. पत्रकारिता करत असताना प्रिंट मीडिया मधील सर्व पत्रकारांनी एकजूट राहणे, येणाऱ्या अडचणींचा एकजुटीने सामना करणे, पत्रकारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे, पत्रकारांना विमा संरक्षण मिळवून देणे, यासह सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी काम करण्याची ग्वाही नूतन अध्यक्ष मुझफ्फर खान यांनी दिली. यावेळी पत्रकार संतोष सावर्डेकर, संतोष कुळे, सुनील दाभोळे, सुशांत कांबळे, बाळू कांबळे, गौरव तांबे आदी उपस्थित होते.
चिपळूण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार मुझफ्फर खान यांची निवड
