मंडणगडमधील तरुणावर गुन्हा दाखल
खेड : खेड तालुक्यातील आंबडस येथे एका व्यक्तीने दोन भावांवर लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. या हल्ल्यात संजय गंगाराम चव्हाण (२६) आणि त्यांचा भाऊ नितीन गंगाराम चव्हाण (३६), दोघेही रा. आंबडस, ता. खेड ) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी संजय चव्हाण यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपी सतिश नथुराम साळुंखे (वय ४४, रा. धुत्रोली, ता. मंडणगड) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांचा भाऊ अजित याच्या घरी असताना ही घटना घडली. अजित आणि वैष्णवी यांनी संजय आणि त्यांचे दुसरे भाऊ नितीन यांना अजितच्या घरी बोलावले होते. घरी गेल्यानंतर वैष्णवी वारंवार शिवीगाळ करत असल्याची तक्रार संजय यांनी आरोपी सतिशकडे केली. यामुळे संतप्त झालेल्या सतिशने संजयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. संजयने सतिशला शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, सतिशने जवळच पडलेला लोखंडी कोयता उचलून संजय आणि नितीन यांच्या डोक्यात मारला.
या हल्ल्यामुळे परिसरात आरडाओरडा सुरू झाला. आवाज ऐकून फिर्यादीची पत्नी अरुणा, मुली काजल आणि पुनम तसेच नितीनची पत्नी मेघा चव्हाण घटनास्थळी धावल्या. संजय यांनी आपला जीव वाचवण्यासाठी आरोपीसोबत झटापट केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या संजय आणि नितीन यांना उपचारासाठी कामथे, ता. चिपळूण येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. संजय यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी सतिश साळुंखे याच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.
खेड पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
खेडमध्ये दोन भावांवर डोक्यात कोयत्याने वार; दोघे गंभीर
