खेड: खेड तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही दोन वर्षांपासून एकही योजना पूर्ण न झाल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. या पार्श्वभूमीवर, भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायतीमधील रखडलेल्या पाणी योजनेमुळे त्रस्त झालेल्या खोंडे ग्रामस्थांनी येत्या १ मे पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
खोंडे ग्रामस्थांनी याबाबत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला लेखी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ठेकेदाराने सहा महिन्यांत पाणी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आता दोन वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. योजनेच्या कामासाठी एकही अधिकारी गावात फिरकला नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्हाला पाणी कधी मिळणार?’ असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
भडगाव खोंडे हे गाव खेड शहरालगत असून येथे मोठी लोकवस्ती आहे. गावात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने पाण्याची गरज अधिक आहे. त्यामुळे खोंडे गावातील पाणी योजना तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत उप अभियंता, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, खेड यांना निवेदन देण्यात आले आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास १ मे रोजी भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जलजीवन मिशनच्या कामांची गती वाढवून गावकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.