ओळख पटविण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
चिपळूण : येथील रेल्वे स्टेशनच्या समोरील परिसरात एका अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी सकाळी ११:३० पूर्वी रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत पडलेला काही नागरिकांना दिसला. त्यानंतर त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीच्या नावाची आणि पत्त्याची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे. नागरिकांना या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास चिपळूण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरात आढळला तरुणाचा मृतदेह
