रत्नागिरी : जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षक बदली प्रक्रियेबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीवरील काही आक्षेप निकाली काढण्यात आले तर काही आक्षेप अमान्य करण्यात आले. शिक्षकांच्या माहितीचा ऑनलाईन डेटा तयार झाला असून, बदलीपूर्व प्रक्रियेला वेग आला आहे.
तीन वर्षांपेक्षा अधिक काळ अवघड अर्थात दुर्गम क्षेत्रातील शाळांमध्ये सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या सुगम भागातील शाळांवर बदल्या करण्यात येणार आहेत. नऊ तालुके मिळून जिल्हा परिषदेच्या एकूण २,३८४ शाळा असून, यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये सुमारे सहा हजार शिक्षक कार्यरत आहेत.
शासनाच्या नियमानुसार, ज्या नियमित शिक्षकांची तीन वर्षांची सेवा अवघड क्षेत्रात पूर्ण झाली, अशा शिक्षकांना साधारण अर्थातच सुगम क्षेत्रात सेवा देण्याची संधी उपलब्ध केली जाते. त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रक्रिया राबविली जाते.
बदलीपात्र शिक्षकांची यादी तयार होणार
बदली प्रक्रियेसाठी सर्व शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर बदली पात्र शिक्षकांची यादी तयार होणार आहे. या यादीवर आक्षेप आले तरी त्याचा निपटारा शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
90 शिक्षकांनी घेतले होते यादीवर आक्षेप
सुकम व अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीवर जवळपास 90 शिक्षकांनी आक्षेप घेतले होते. या आक्षेपाचा प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने निपटारा करण्यात आला. काही आक्षेप स्वीकारण्यात आले तर काही आक्षेप शिक्षण विभागाकडून फेटाळून लावण्यात आले आहेत.
जिल्ह्यात शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा डेटा तयार; 3 वर्षे एकाच शाळेत असलेल्या शिक्षकांची होणार बदली
