आज रात्री होणार बहुरंगी नमन
मानसकोंड: श्री रवळनाथ सेवा मंडळ, किंजळेवाडी (मानसकोंड) येथे शनिवार, दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शनिवारी सकाळी ६ वाजता काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ७ वाजता श्री हनुमानाला अभिषेक करण्यात आला. सकाळी १० वाजता हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. सायंकाळी ५ वाजता श्री हनुमानाची सुंदर पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली, ज्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात सहभाग घेतला.
आज, रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. सकाळी १० वाजता महिला मंडळाच्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला. दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ५ वाजता भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
रात्री ८ वाजता श्री रवळनाथ सेवा मंडळ किंजळेवाडी (मानसकोंड) यांच्या नामांकित बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे. यात कोकणचे प्रसिद्ध खेळे आणि पौराणिक गण सादर केले जातील. विशेष आकर्षण म्हणून लेखक प्रशांत प्रकाश कदम यांचे ‘यमाचे गर्वहरण’ आणि स्त्री पात्रांनी नटलेली गण गौळण तसेच काल्पनिक वगनाट्य ‘शिपायांची कमाल राजाची धमाक (अर्थात) बिन लग्नाचा राज’ हे सादर होणार आहेत.
श्री खळनाथ सेवा मंडळाने सर्व भाविकांना या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून तिर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे नम्र आवाहन केले आहे. हनुमान जयंती उत्सवामुळे किंजळेवाडी परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.