अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण
खेड:- तालुक्यातील कुळवंडी-खालीलवाडी येथे श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सवाची धामधूम सुरू असताना, शुक्रवारी रात्री मंदिरा जवळील एका मोठ्या वडाच्या झाडाला अचानक आग लागल्याने उपस्थित ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे ९:३५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हनुमान जयंती उत्सवानिमित्त मंदिरात आणि परिसरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी अचानक वडाच्या झाडाने पेट घेतला. बघता बघता आगीने मोठे स्वरूप धारण केल्याने भीतीचे वातावरण पसरले व ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली.
घटनेची माहिती तात्काळ खेड नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्राला देण्यात आली. त्यानुसार, अग्निशमन केंद्राचे फायरमन दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग, प्रणय रसाळ आणि वाहनचालक गजानन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून वडाच्या झाडाला लागलेली आग आटोक्यात आणली. आग विझल्यानंतर उपस्थित सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र वेळेवर नियंत्रण मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.