देवीचे ‘सत्व’ परत आणण्यासाठी भगताची अजब मागणी; दापोली पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अंधश्रद्धेचा डाव फसला
दापोली:-दापोली तालुक्यातील एका गावात देवीच्या मूर्तीतील कथितरित्या चोरून नेलेले ‘सत्व’ परत आणून मूर्तीत प्रस्थापित करण्याच्या नावाखाली एका भगताने तब्बल एक लाख रुपये, एक बोकड आणि अकरा कोंबड्यांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, दापोली पोलिसांच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे अंधश्रद्धा पसरवणारा हा डाव फसला. या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या एका गावात काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून देवीचे भव्य मंदिर बांधण्यात आले होते. परंतु, काही महिन्यांतच मंदिराच्या भिंतींना तडे गेले. ग्रामस्थांनी देवीला कळे लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. दरम्यान, गावातील एका ग्रामस्थाच्या वागणुकीवर इतरांना संशय आला. अधिक चौकशी केली असता, त्या ग्रामस्थाच्या पूर्वजांनी मंदिरातील देवीच्या मूर्तीमधील ‘सत्व’ काढून आपल्या घरी नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली, ज्यामुळे गावात खळबळ उडाली.
गावकऱ्यांनी संबंधित ग्रामस्थावर दबाव आणून देवीचे ‘सत्व’ पुन्हा मंदिरात आणून मूर्तीत प्रस्थापित करण्यास सांगितले. यावर त्या ग्रामस्थाने गावाबाहेरील एका भगताशी संपर्क साधला. या भगताने हे काम करण्यासाठी १ लाख रुपये रोख बिदागी, एक बोकड, ११ कोंबड्या आणि इतर पूजा साहित्याची अजब मागणी केली. संबंधित ग्रामस्थाने ही मागणी मान्य करून विधीचा दिवसही निश्चित केला होता.
मात्र, या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रकाराची कुणकुण दापोली पोलिसांना लागली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हा विधी उधळून लावला. पोलिसांनी संबंधित ग्रामस्थ आणि भगतासह सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणारे कृत्य न करण्याबाबत पोलिसांनी सक्त ताकीद दिली. यावेळी भगताने आपली चूक कबूल केली आणि भविष्यात असे कृत्य करणार नसल्याचे आश्वासन दिले.
या संपूर्ण प्रकारामुळे दापोली तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत असून, अंधश्रद्धेच्या या प्रकारावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.