रत्नागिरी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनातर्फे देशभर ‘जयभीम पदयात्रा ‘ चे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने आज रविवार दि. १३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या जयभीम रॅलीमध्ये एनसीसी , एनएसएस , नेहरू युवाकेंद्र , माय भारत स्वयंसेवक , तसेच स्काऊट – गाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सर्व शाळांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण लोहार (योजना ) ,शिक्षणाधिकारी (माध्यमिक )सुवर्णा सावंत , जिल्हाक्रीडा अधिकारी विजय शिंदे , स्काऊट गाईड जिल्हा संघटक रमाकांत डिंगणे यांनी केले होते.
सकाळी ७ः ३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत छ. शिवाजी स्टेडीयम इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड , जिल्हा युवा अधिकारी (नेहरू युवाकेंद्र ) , रत्नागिरी तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप, जिल्हा स्काऊट संघटक रमाकांत डिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिर्के प्रशालेच्या स्काऊट विद्यार्थ्यांनी ढोल व झांज पथकाच्या माध्यमातून सलामी देण्यात आली त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करण्यात आला.
जयभीम रॅलीला उपस्थित मान्यवरांकडून हिरवे निशाण दाखविण्यात आले . ढोल पथक व झांज च्या ताल-नादावर घोषणांच्या जयजयकारात जयभीम रॅलीला सुरुवात करण्यात आली . त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला . मात्र नगरपरिषदेला सदर रॅली संदर्भात काहीच देणे – घेणे नसल्याप्रमाणे छ. शिवराय यांच्या पुतळ्यास कुलुप असल्याने उपस्थित मान्यवरांनी थेट चबुतऱ्यावर मावळ्यां प्रमाणे चढून पुष्पहार अर्पण केला याबद्दल विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या कसरती धैर्यालाही दाद दिली . त्यांनंतर छ. शिवाजी महराज की जय ! घोषणा देत जयभीम पदयात्रा ढोल ताशांच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रत्नागिरी नगरपरिषद येथे रवाना झाली.
यावेळी उपस्थित पटवर्धन हायस्कूल मुख्याध्यापक जानकी वेल्हाळ – घाटविलकर यांनी भारतीय संविधानकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला .त्यानंतर मायबापबालसेवा फाऊंडेशन तर्फे स्काऊट मास्टर प्रशांत जाधव यांनी संविधान उद्देशिका सांगितली व उपधितांकडून प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन देखील करण्यात आले. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे त्या प्यायल्यावर कोणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगून विद्यार्थ्यांनी शिक्षणात मनापासून लक्ष घालून शिका संघर्ष करा व संघटीत व्हा ! या बाबासाहेबांच्या उपदेशाचा आदर्श नेहमी समोर ठेवावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी मुंबई युनिव्हर्सिटी (एनएसएस पथक ), गोगटे कॉलेज ,पटवर्धन हायस्कूल , एम.डी. नाईक हायस्कूल , शिर्के हायस्कूल ,नवनिर्माण कॉलेज फाटक हायस्कूल आदी शैक्षणिक संस्थानी व लायन्स क्लब प्रतिनिधींनी उत्स्कुर्त सहभाग घेतला.