राजापूर:- तालुक्यातील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी एक आश्चर्यकारक घटना घडली. पाचल येथील ४५ वर्षीय वहिदा प्रभूलकर या महिलेचे हृदय बंद पडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्पर आणि योग्य उपचारामुळे त्यांना नवजीवन मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वहिदा प्रभूलकर यांना रुग्णालयात आणले त्यावेळी त्यांच्या हृदयाची धडधड जवळजवळ थांबली होती. रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकुमार पंदेरीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित उपचार सुरू केले. त्यांनी तातडीने पंपिंग प्रक्रिया सुरू केली आणि काही वेळातच चमत्कारीरित्या महिलेच्या हृदयाचे कार्य पुन्हा सुरू झाले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे एका गंभीर रुग्णाला जीवनदान मिळाले आणि वैद्यकीय क्षेत्राचा हा मोठा विजय ठरला.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.
रायपाटणचे ग्रामीण रुग्णालय परिसरातील सुमारे ६० ते ७० गावांसाठी मागील ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. राजापूर शहरा नंतर असलेले हे एकमेव मोठे ग्रामीण रुग्णालय असून या भागातील लोकांसाठी ते आधारस्तंभ ठरले आहे. या रुग्णालयात यापूर्वीही विंचू दंश आणि सर्पदंशासारख्या गंभीर प्रकरणांवर यशस्वी उपचार झाले आहेत, ज्याची आठवण आजही लोक करतात.
शुक्रवारी घडलेल्या या घटनेत डॉ. सूर्यकुमार पंदेरीकर यांच्यासह कर्मचारी सायली शिंदे, यशश्री कारेकर, प्रतीक्षा दाते, वेदांत कोटकर, अक्षय नादकुळे, श्रीमती तेरवणकर आणि समीर बारस्कर यांच्या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे एका महिलेचा जीव वाचला.
रायपाटण गावचे सरपंच निलेश चांदे आणि ग्रामस्थांनी डॉ. पंदेरीकर व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले असून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. या घटनेमुळे रायपाटण ग्रामीण रुग्णालयावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.