मुंबई: राजापूर तालुक्यातील काही कुणबी तरुणांनी एकत्र येत ‘कोकणफ्रेश ऍग्रो प्रोडक्टस’ या नवीन व्यवसायाची मुंबईत यशस्वी सुरुवात केली आहे. किशोर मांडवकर, प्रकाश दिवाळे, संजय आग्रे, रामचंद्र रांबाडे आणि सूर्यकांत गोताड या दूरदृष्टीच्या तरुणांनी अनेक अडचणींवर मात करत आपल्या मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
“कुणबी तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात उतरलं पाहिजे” या आपल्या युवा पिढीच्या ध्येयाला प्रत्यक्षात साकार करत या तरुणांनी कोकणाच्या निसर्गातील महत्वपूर्ण घटक असलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते ‘कोकणफ्रेश’ या नावाने बाजारात आणले आहे. व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून सुरु केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
या सामूहिक प्रयत्नाबद्दल बोलताना एका तरुण उद्योजकाने सांगितले की, “अनेक अडचणी आल्या, संकटांचा सामना करावा लागला. मात्र, आम्ही हार मानली नाही. एकजूट आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आज आम्ही हे यश मिळवले आहे.”
राजापुरातील या कुणबी युवकांनी उचललेले हे पाऊल निश्चितच भविष्यात इतर कुणबी तरुणांनाही व्यवसायात उतरण्याची प्रेरणा देईल यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या या यशस्वी वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत.