खेड : तालुक्यातील मौजे बोरज येथील एका व्यावसायिकाला, त्याने दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीकडून १ लाख रुपये स्वीकारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत विशाल विवेक घोसाळकर (३८, व्यवसाय शेती/व्यापार, रा. बोरज घोसाळकरवाडी, ता. खेड) यांनी शनिवारी, १२ एप्रिल रोजी खेड पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, घोसाळकर यांनी खेड तहसील कार्यालयात एका केमिकल कंपनीकडून मौजे बोरज येथील गट क्रमांक ७०७ मध्ये बेकायदेशीररित्या केमिकल उघड्यावर टाकले जात असल्याची तक्रार दाखल केली होती.
ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी १) परेश उदय शिंदे (रा. बोरज), २) सुरज सुरेंद्र पडयाळ (रा. बोरज) आणि ३) सुरज दिलखुश तांबे (रा. निगडे, ता. खेड) यांनी फेब्रुवारी २०२५ ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत संगनमत करून फिर्यादी घोसाळकर यांना धमकावण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्या (एम.एच. ०८ बी.सी. २२६६) या गाडीतून येऊन घोसाळकर यांना ‘कोणत्या ना कोणत्या खोट्या केसमध्ये अडकवू’, ‘तुमच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू’ अशी धमकी दिली. तसेच, ‘आमच्या मुंबई-पुण्यात गँग आहेत, एक गँग बोलावली तर तुम्हाला ठार करू,’ अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.
तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी १० लाख रुपयांची व दरमहा १० हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडून १ लाख रुपये स्वीकारले आहेत.
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विशाल घोसाळकर यांनी शनिवारी सकाळी १०:५७ वाजता खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०८ (२) (३) (खंडणी), ३५२ (धमकी देणे) तसेच कलम રૂ११(૨), રૂ११(રૂ), રૂ(4)) गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.
खेड : तक्रार मागे घेण्यासाठी व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी, १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
