रत्नागिरी:पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर सुमारे महिनाभरापूर्वी समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या सात भारतीय खलाशांची अखेर सुखरूप सुटका झाली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तरुणांचा समावेश असून, त्यांच्या सुटकेमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण जिल्ह्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. केंद्र सरकार आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे यश मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘एमव्ही बिटू रिव्हर’ नावाचे डांबर (बिटुमेन) वाहतूक करणारे जहाज कॅमेरूनमधील डुआला बंदराकडे निघाले होते. पश्चिम आफ्रिकेच्या सागरी हद्दीत पोहोचल्यावर समुद्री चाच्यांनी जहाजावर हल्ला चढवून ते ताब्यात घेतले. जहाजावरील सात भारतीय खलाशांचे चाच्यांनी अपहरण केले. यामध्ये रत्नागिरी शहरातील भाटकरवाडा येथील समीन जावेद मिरकर आणि कर्ला येथील रेहान शब्बीर सोलकर या दोन तरुणांचा समावेश होता. इतर खलाशी तामिळनाडू आणि केरळ येथील होते.
गेला महिनाभर हे सर्वजण समुद्री चाच्यांच्या कैदेत होते. या घटनेने रत्नागिरीतील मिरकर आणि सोलकर कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले होते. या अपहरणाच्या घटनेची केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाने गंभीर दखल घेतली होती. तसेच, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून तरुणांच्या सुटकेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या एकत्रित प्रयत्नांना यश आले असून, शुक्रवार, दिनांक ११ एप्रिल रोजी सर्व सात भारतीय खलाशांची समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर समीन मिरकर आणि रेहान सोलकर यांच्या कुटुंबीयांनी आणि रत्नागिरीकरांनी आनंद व्यक्त केला आहे.
सुटका झालेले समीन आणि रेहान हे दोन्ही तरुण शनिवारी, १२ एप्रिल रोजी आफ्रिकेतून भारताकडे परतण्यासाठी निघाले असून, ते लवकरच आपल्या घरी रत्नागिरीत परततील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या परतण्याची कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत आहेत.