प्रांताधिकारी जीवन देसाई यांचा आदेश; दोघांवरील सुनावणी सुरूच
रत्नागिरी: शहरात अमली पदार्थांची विक्री आणि संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याप्रकरणी एका महिलेसह तिघा जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी शुक्रवारी (दि. ११) दिले आहेत. या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये रत्नागिरीतील झाडगाव येथील हेमंत भास्कर पाटील, राजीवडा येथील रिहाना उर्फ रेहाना उर्फ रिजवाना गफार पखाली आणि जयस्तंभ येथील अमेय राजेंद्र मसुरकर यांचा समावेश आहे. या तिघांनाही रत्नागिरी जिल्ह्यासह लगतच्या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थ विक्री संदर्भात एकूण ९ प्रकरणे प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केली होती. यापैकी तिघांना यापूर्वीच हद्दपार करण्यात आले होते. शुक्रवारच्या कारवाईनंतर एकूण ६ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली आहे.
या प्रकरणी आणखी दोघांविरोधात सुनावणी सुरू असून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, आणखी एक संशयित आरोपी अमीर मुजावर याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव दाखल असून, तो सध्या जिल्हा कारागृहात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.