लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा शहरात गुरुवारी रात्री सुमारे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास एका दुर्दैवी अपघातात गवा रेड्याचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बससमोर अचानक गवा रेडा आल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, लांजा शहरातील रेस्ट हाऊसजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या लक्झरी बसची गवा रेड्याला समोरासमोर जोरदार धडक बसली. या धडकेत गवा रेडा गंभीर जखमी झाला आणि काही वेळ तडफडत त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती तत्काळ लांजा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोपर्यंत गवा रेड्याचा प्राण गेला होता. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत गवा रेडा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे ४ वर्ष होते.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वन्यजीव आणि महामार्ग यामधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. महामार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज या घटनेनंतर पुन्हा अधोरेखित झाली आहे. वन विभाग पुढील कार्यवाही करत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे बसच्या धडकेत गवा रेड्याचा मृत्यू
