लांजा:-मठ येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाच्या १०९ व्या चैत्रोत्सवात आज, शुक्रवार, ११ एप्रिल २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान (मठ) आणि रत्नागिरीतील धन्वंतरी धर्मादाय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर मंदिरात सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत पार पडणार आहे.
श्री लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव ७ एप्रिलपासून सुरू असून तो १२ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन जणांचे प्राण वाचवू शकते आणि रक्तदान हा समाजाने निरंतर करत राहण्याचा यज्ञ आहे, असे संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे धार्मिक विधींसोबतच या रक्तदानाच्या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री लक्ष्मीपल्लीनाथाचे कुलोपासक तसेच सर्व भाविकांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानने केले आहे.
स्थळ: श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर, मठ, ता. लांजा, जिल्हा रत्नागिरी
दिवस आणि वेळ: शुक्रवार, ११ एप्रिल २०२५, सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत.