खेड : शहरातील एका तरुण उद्योजकाच्या नव्या आयशर ट्रकचे स्पेअर पार्ट लोटे येथील हॉटेलसमोरून चोरीला गेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये ट्रकचे टायर (डिस्कसह), दोन्ही बॅटऱ्या आणि सुमारे १०० लिटर डिझेल असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण उद्योजकाने काही महिन्यांपूर्वीच हा नवा आयशर ट्रक खरेदी केला होता. त्यांनी आपला ट्रक लोटे येथील एका हॉटेलसमोर रात्री पार्क केला होता. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रकचे स्पेअर टायर, दोन बॅटऱ्या आणि इंधन टाकीतील सुमारे १०० लिटर डिझेल चोरून नेले. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेमुळे तरुण उद्योजकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.