लांजा : मूळ लांजा तालुक्यातील वेरळ येथील रहिवासी असलेले आणि सध्या गोव्यात वास्तव्यास असलेले एक ज्येष्ठ नागरिक शनिवारी दुपारी आडवली रेल्वे स्थानकावर अचानक चक्कर येऊन कोसळले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. शांताराम गोविंद डाकवे (६०, मूळ रा. वेरळ डाकेवाडी, ता. लांजा, सध्या रा. गोवा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम डाकवे हे काही कामानिमित्त आपल्या लांजा येथील गावी आले होते. काम आटोपल्यानंतर ते गोव्याला परत जाण्यासाठी शनिवारी दुपारी आडवली रेल्वे स्थानकावर आले होते. दुपारी 3.45 वाजता ते प्लॅटफॉर्मवरील बाकड्यावर गाडीची वाट पाहत बसले होते. त्यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बाकड्यावरच बेशुद्ध होऊन कोसळले.
या घटनेची माहिती मिळताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेसोबत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्री. डाकवे यांची तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लांजा : चक्कर येऊन पडल्याने वृद्धाचा आडवली रेल्वे स्थानकात मृत्यू
