लांजा:- लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून लांजा शहराचा प्रारूप विकास आराखडा (डिपी प्लॅन) जाहीर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हा डीपी प्लॅन जाहीर करताना लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील शेतकरी, नागरिकांना याबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन वा माहिती देण्यात आलेली नाही. या प्लॅनमध्ये असलेल्या विविध झोनमध्ये नागरिकांचे होणारे नुकसान किंवा फायदे लोकांना त्यांच्या जमीन-जुमल्यांचा मिळणारा मोबदला, तो मोबदला कमी अधिक प्रमाणात आहे किंवा कसा काय? आदी सर्वच प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी लांजा भाजपाचे माजी नगरसेवक संजय यादव यांनी केली आहे.
डीपी प्लॅन संदर्भात पुरेशी माहिती नसल्याने लांजा वासियांचे मोठे नुकसान होणार आहे. अशी परिस्थिती असताना राजकीय पुढाऱ्यांकडून मात्र याबाबत मौन पाळले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान या प्रारूप विकास आराखड्या संदर्भात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचे माजी नगरसेवक संजय यादव यांनी सांगितले.
लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून प्रारूप विकास योजना आराखडा (डिपी प्लॅन) जाहीर करण्यात आला आहे. २५ मार्च रोजी हा ओपन करण्यात आला असून २७ मार्च रोजी नगरपंचायत कार्यालय येथे प्लॅनचा नकाशा नागरिकांचे अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. २८ एप्रिल पर्यंत नागरिकांनी या संदर्भात आपल्या हरकती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या हरकती लांजा नगरपंचायत कार्यालयात नोंदवायच्या आहेत. या डीपी प्लॅन मध्ये २८ ग्राउंड तसेच मोठमोठे रस्ते प्रस्तावित आहेत. या रस्त्यांच्या कामांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी किंवा घर देखील जाण्याची भीती आहे. मात्र त्या संदर्भात नागरिकांना त्यांच्या जमीन जागेचा मोबदला काय मिळणार? किंवा कशा प्रकारे मिळणार? किंवा नाही मिळणार? अनेक ठिकाणी रस्त्यांमुळे जागांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होणार असून त्याबाबत नागरिकांना नेमका कशा पद्धतीने नुकसान भरपाई मिळणार याबाबतची माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती देताना भाजपाचे माजी नगरसेवक संजय यादव यांनी सांगितले की, सन २०२२ पासून मी स्वतः आणि माजी नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी या डीपी प्लॅन अर्थात विकास आराखडा ओपन करायला दिला नव्हता. मात्र नगरपंचायत बॉडीचा कालावधी संपल्यानंतर प्रशासनाने स्वतःच्या मर्जीने तो डिपी प्लॅन ओपन केला आहे. सदर डीपी प्लॅन हा सांताक्रुज मुंबई येथील मे.टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेला आहे. मात्र या कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांकडून नागरिकांना डिपी प्लॅन बाबत मार्गदर्शन किंवा माहिती देण्यात आलेली नाही. लोकांना या डिपी प्लॅन बाबत माहिती द्यावी यासाठी मे.टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे पत्र व्यवहार देखील करण्यात आला होता मात्र कंपनीकडून कोणत्या प्रकारची भेट देण्यात आलेली नाही. तर लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून देखील नागरिकांना या डीपी प्लॅन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेले नाही.
सर्वसामान्य शेतकऱ्याला, नागरिकाला या डीपी प्लॅनची कोणत्या प्रकारची कल्पना नाही. त्याचा अर्थ कसा लावायचा? त्याप्रमाणे या डीपी प्लॅन मध्ये आपल्याला जमीनजागेचा मोबदला कसा मिळणार? याची देखील लोकांना माहिती नाही. या संदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था असून लोकांनी वेळेत हरकती न घेतल्यास त्यांना मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय पुढाऱ्यांकडून मात्र या संदर्भात मौन बाळगण्यात आलेले आहे. त्यामुळे लांजाला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न यामुळे नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. या डीपी प्लॅन मध्ये ग्रीन झोन व अन्य विविध प्रकारचे झोन आहेत. मात्र या झोन बाबत लोकांना काहीही माहिती नाही. म्हणूनच लोकांनी या प्रारुप विकास योजने संदर्भात आपल्या हरकती नोंदवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील माजी नगरसेवक संजय यादव यांनी केले आहे. लोकांनी वेळीच या संदर्भात हरकती न घेतल्यास त्यांना आयुष्यभराच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे आणि म्हणूनच या संदर्भात लवकरच आपण खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे संजय यादव यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे प्रशासनाकडून लवकरात लवकर या डीपी प्लॅन संदर्भात मीटिंग लावून लोकांना आवश्यक असणारी माहिती द्यावी, अशी मागणी संजय यादव यांनी केली आहे.
लांजा शहराचा विकास आराखडा जाहीर ; नागरिकांना कल्पनाच नाही
