खेड: खेड तालुक्यातील काडवली-गजवाडी येथून चोरी झालेल्या १० लाख रुपये किंमतीच्या जेसीबी साहित्यासह पोलिसांनी नांदेडमधील दोघा संशयितांना अटक केली आहे. देवराव बाबुराव धोत्रे (वय ३९, रा. शिवाजीनगर-नांदेड) आणि सुरेश रामू दांडेकर (रा. वसर्ली-नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पोलिसांनी चोरी केलेले सर्व साहित्य चिरणी-धनगरवाडी येथील जंगलमय भागातून हस्तगत केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रल्हाद प्रकाश लाड यांनी काडवली-गजवाडी येथे सार्वजनिक विहिरीच्या खोदाई कामासाठी नवीन जेसीबी मशिन ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी या मशिनमधील सुमारे ३ टन वजनाचे साहित्य आणि इतर सुटे भाग चोरून नेले होते. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान, अटक करण्यात आलेला संशयित देवराव धोत्रे हा पूर्वी फिर्यादी प्रल्हाद लाड यांच्याकडे कामाला होता. तर दुसरा संशयित सुरेश दांडेकर हा नांदेडहून येथे आला होता. यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक पथक नांदेडला पाठवले. पोलिसांना नांदेडमध्ये आल्याची माहिती मिळताच दोन्ही संशयित पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी दोघांनाही नांदेड बसस्थानकातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोन्ही संशयितांनी चोरी केलेले जेसीबीचे साहित्य चिरणी-धनगरवाडीतील जंगलमय भागात लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन १० लाख रुपये किंमतीचे सर्व साहित्य जप्त केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस कॉन्स्टेबल शिरीष साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे इतर चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस त्या दृष्टीने अधिक तपास करत आहेत.
खेड: चोरलेले जेसीबी साहित्य संशयितांकडून जप्त
