मुंबई: “12th Fail” या प्रसिद्ध चित्रपटातून प्रेरणा देणारे IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्यासोबतची भेट माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरली, असे मत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे कोकण प्रमुख श्री सैफ सुर्वे यांनी व्यक्त केले.
आज झालेल्या या विशेष भेटीदरम्यान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य मा. श्री. राहुल भैया दुबाले आणि संघटनेचे कोर कमिटी सदस्य श्री सिद्धार्थ बागुल देखील उपस्थित होते. श्री राहुल भैया यांनी या भेटीचे आयोजन केले होते.
या भेटीबाबत बोलताना श्री सुर्वे म्हणाले, “IPS मनोज कुमार शर्मा सरांनी आम्हाला जवळपास एक तास वेळ दिला, ही बाबच खूप मोठी आहे. संघटनेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातूनही त्यांनी आम्हाला दिलेला वेळ आणि मार्गदर्शन यामुळे आम्हाला जीवनातील अनेक गोष्टींकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
शर्मा सरांनी त्यांच्या १२वीतील अपयशाचा आणि त्यानंतर जिद्दीने UPSC परीक्षेत मिळवलेल्या यशाचा अनुभव कथन केला. या संघर्षाच्या कहाणीतून प्रेरणा घेत श्री सुर्वे म्हणाले, “सरांनी सांगितले की, जीवनात अडचणी येतात, पण त्याच परिस्थितीतून माणसाचे खरे रूप घडते. जर आपण हार न मानता प्रयत्न करत राहिलो, तर यश निश्चित मिळते.”
श्री सुर्वे यांनी शर्मा सरांच्या नम्र आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, “एवढे मोठे अधिकारी असूनही त्यांनी आमच्याशी अत्यंत सहजपणे संवाद साधला आणि वेळ दिला. त्यांच्या प्रत्येक बोलण्यात अनुभव आणि विचारांची स्पष्टता जाणवत होती.”
या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील पोलिसिंग, युवकांची भूमिका आणि प्रशासनातील सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. श्री सुर्वे यांनी सांगितले की, शर्मा सरांचे विचार अत्यंत स्पष्ट आणि सकारात्मक होते, ज्यामुळे त्यांना नवी दिशा मिळाली आहे.
शेवटी बोलताना श्री सुर्वे म्हणाले, “’12th Fail’ हा चित्रपट पाहून खूप प्रेरणा मिळते, पण त्या चित्रपटाच्या नायकाला प्रत्यक्ष भेटून त्यांचे विचार ऐकणे हा एक वेगळाच अनुभव होता. ही भेट माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते.”