खेड: तालुक्यातील होडखाड-वरचीवाडी येथील रहिवासी असलेला सुशांत गणपत शिगवण (वय ३०) या नवविवाहित तरुणाचा गुरुवारी रात्री मुंबईतील कुर्ला येथे रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या सुशांतच्या अकाली निधनामुळे शिगवण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत शिगवण हा कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होता. डिसेंबर महिन्यात त्यांचा तुंबाड येथील एका तरुणीसोबत विवाह झाला होता. नवीन संसाराची स्वप्ने रंगवत असतानाच गुरुवारी रात्री कामावरून परत येत असताना कुर्ला येथे त्याचा रेल्वे अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की, सुशांत यांच्या शरीराची ओळख पटवणे पोलिसांना सुरुवातीला कठीण झाले होते. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या ओळखपत्रामुळे त्याची ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांनी सुशांत यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला आणि रात्री उशिरा तो त्याच्या गावी, होडखाड-वरचीवाडी येथे आणण्यात आला.
सुशांत याचा मृतदेह पाहून त्यांची पत्नी आणि आई यांनी एकच हंबरडा फोडला, ज्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. शुक्रवारी सकाळी त्याच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. सुशांत यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर मोठे दु:ख ओढवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.