पंचायत समितीचा कारभार प्रभारींच्या हाती; गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह अनेक प्रमुख पदे अनेक वर्षांपासून रिक्त
राजापूर : सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या राजापूर पंचायत समितीमधील प्रमुख प्रशासकीय पदांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह अनेक महत्त्वाची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज संथ गतीने सुरू आहे. याचा परिणाम तालुक्यातील विकासकामांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विस्तारलेल्या राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा कारभार पंचायत समितीच्या माध्यमातून चालवला जातो. या प्रशासकीय कामांना गती मिळण्यासाठी पंचायत समितीमधील प्रमुख अधिकाऱ्यांची पदे भरणे आवश्यक आहे. मात्र, राजापूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांचे पद मागील सात महिन्यांपासून रिक्त आहे. तर कृषी अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पद तब्बल पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रिक्त आहे. याव्यतिरिक्त सहाय्यक प्रशासन अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी आणि बांधकाम विभागातील उपअभियंता यांसारखी महत्त्वाची पदेही रिक्त असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.
*रिक्त पदांची यादी*
* गटविकास अधिकारी
* कृषी अधिकारी
* सहाय्यक प्रशासन अधिकारी
* सहाय्यक लेखाधिकारी
* उपअभियंता, बांधकाम विभाग
* गटशिक्षणाधिकारी
*ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत*
तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्यासाठी ९१ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या केवळ ६४ अधिकारी कार्यरत असून २७ पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड भार पडत आहे. एका अधिकाऱ्याला अनेक ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळावा लागत असल्याने त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. याचा थेट परिणाम गावविकासाच्या कामांवर होत असून, विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वर्षानुवर्षे प्रमुख प्रशासकीय पदे रिक्त असल्याने राजापूर पंचायत समितीच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने रिक्त पदांवर कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, प्रभारींच्या भरवशावर तालुक्यातील विकासकामांची गती मंदावण्याची शक्यता आहे.
राजापूरच्या विकासाला बसणार खीळ?
