खेड: तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात एका ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संदीप शंकर जाधव (वय ४५ वर्षे, रा. मुद्रे, जि. सातारा) असे मृत चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप जाधव हे त्यांच्या ट्रक क्रमांक (डीडी ०३ आर ९०३३) मधून लोटे एमआयडीसी येथील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीतील माल घेऊन कर्नाटकमध्ये जात होते. त्यांच्या सोबत आणखी एक व्यक्ती कंपनीत माल भरण्यासाठी आली होती. मात्र, ट्रक भरण्यासाठी नंबर नसल्याने ते दोघेही लोटे येथे मुक्कामी राहिले.
०३ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता जेवणानंतर संदीप जाधव हे त्यांच्या ट्रकच्या केबिनमध्ये झोपण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी, सकाळी साडेसात वाजता त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने माल भरण्यासाठी कंपनीत जाण्यासाठी संदीप यांना आवाज देत होती. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ट्रकच्या केबिनमध्ये जाऊन पाहिले असता, संदीप जाधव हे उताणे झोपलेले दिसले आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाहीत.
त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि संदीप जाधव यांना पर्शुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. संदीप जाधव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.