चिपळूण (प्रतिनिधी) : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूलमध्ये गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे मूल्यमापन करण्याच्या हेतूने राज्यस्तरीय समितीकडून परीक्षण करण्यात आले. दरवर्षी राज्यातील विविध शाळांत ही स्पर्धा आयोजित केली जाते. वर्षभर स्वच्छतेचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे धडे गिरवावेत, स्वतःपासून स्वच्छता अंगीकारावी या उद्देशाने ही स्पर्धा घेऊन वर्षाच्या शेवटी मूल्यांकन केले जाते.
यंदा राज्यातील ४६ शाळा या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून दलवाई हायस्कूल, मिरजोळीची अंतिम फेरीत निवड झाली. दलवाई हायस्कूलने राबविलेल्या विविध स्वच्छता विषयक उपक्रमांचे परीक्षण मूल्यमापन करण्यासाठी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता समिती शाळेत मूल्यमापनासाठी दाखल झाली. परीक्षण करण्यासाठी गांधी तीर्थ स्वच्छता समितीचे राज्य समन्वयक गिरीश कुलकर्णी, विश्वजीत पाटील, संजय जाधव हे मान्यवर उपस्थित होते. या समितीचे स्वागत मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी केले. यावेळी विद्यालयातील सहाय्यक शिक्षक ऋषिकेश भागवत यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलेले स्वागत गीत व स्वच्छता गीत मान्यवरांसमोर विद्यार्थिनींनी सादर केले. त्यानंतर समितीच्या सर्व सदस्यांनी शालेय परिसराची पाहणी केली. तसेच स्वच्छतेविषयक तयार करण्यात आलेली पोस्टर रांगोळी, चित्रे, भित्तिपत्रके, टाकाऊतून टिकाऊ वस्तू, कंपोस्ट खत निर्मिती तसेच प्रशालेची संपूर्ण इमारत वर्गखोल्या, फलक लेखन याचे निरीक्षण केले. या प्रसंगी प्रशालेच्या शिक्षिका व या उपक्रमाच्या समन्वयक सौ.संध्या बोराटे यांनी प्रास्ताविक केले. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. विद्या जाधव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यानंतर समितीतील सदस्यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी चर्चा केली. गांधी तीर्थ स्वच्छता समितीचे राज्य समन्वयक गिरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे मूल्य तसेच स्वच्छतेचे संस्कार रुजविणे हे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या उपक्रमासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी प्रशालेच्या प्रगतीचा आलेख समितीसमोर मांडला. राज्यस्तरीय समितीच्या सदस्यांनी शाळेतील विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी राज्यस्तरीय समितीचे समन्वयक सदस्य यांचे आभार व्यक्त केले
दलवाई हायस्कूलचे गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता समितीकडून परीक्षण
