शिवसेना ठाकरे गट आक्रमक; कामांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांचा आरोप
रत्नागिरी : राजापूर पंचायत समितीच्या आवारातील विविध इमारतींच्या दुरुस्तीसाठी सुमारे ३२ लाख रुपयांचा निधी अनाठायी खर्च केल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नुकतेच राजापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांना यासंदर्भात लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समितीच्या आवारात असलेल्या गोडाऊनच्या दुरुस्तीसाठी सुमारे १६ लाख रुपये खर्च करण्यात आआला आहे. मात्र, प्रत्यक्षात तेवढ्या रकमेचे काम झालेले नाही. त्यामुळे या कामाची पाहणी करण्याची मागणी शिवसैनिकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच, गटविकास अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात कोणीही नसताना त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा सुमारे दोन कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अशा स्थितीत जुन्या इमारतींच्या दुरुस्तीवर खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांनी उपस्थित केला. याव्यतिरिक्त, किसान भवन सभागृहासमोरील पडवीच्या दुरुस्तीचे काम का काढले, आणि त्याचा उद्देश काय आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. कदम यांनी सांगितले की, प्रत्यक्षात या सर्व कामांसाठी चार ते पाच लाख रुपये पुरेसे असताना सुमारे ३२ लाख रुपये खर्च करणे संशयास्पद आहे.
या सर्व कामांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत, कदम यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी निवेदन सादर करताना तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य तात्या सरवणकर, अनिल कुडाळी, राजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनय गुरव, संतोष हातणकर, शहर प्रमुख संजय पवार, संगीता चव्हाण, प्रतीक्षा मांजरेकर, माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.
राजापूर पंचायत समिती आवारातील इमारतींच्या दुरुस्तीसाठी ३२ लाखांचा अनाठायी खर्च
