खेड : खेड तालुक्यातील काडवली-गजवाडी येथे नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदकामासाठी ठेवलेल्या १० लाख रुपये किमतीच्या जेसीबी मशिनच्या साहित्याची चोरी झाली होती. याप्रकरणी खेड पोलिसांनी दोघांना नांदेड येथून अटक केली आहे.
प्रल्हाद प्रकाश लाड यांनी ३ मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या मालकीचे जेसीबी मशिन विहिरीच्या खोदकामासाठी गजवाडी येथे ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी ३ टन वजनाच्या मशिनसह इतर सुटे भाग चोरून नेले होते. चोरीला गेलेल्या साहित्याची किंमत १० लाख रुपये होती.
खेड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, पोलिसांना नांदेड येथील दोघांचा या चोरीत सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एक पथक नांदेडला पाठवून दोघांना अटक केली. दोन्ही संशयिताना रेल्वेने खेडला आणले.
चोरीला गेलेले साहित्य नेमके कुठे आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या चोरट्यांकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
खेडमध्ये १० लाखांच्या जेसीबी चोरीप्रकरणी नांदेडमधील दोघांना अटक
