रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील एका शिक्षिकेने तालुक्यातील शिक्षण विभागाचा वरिष्ठ अधिकारी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे केली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दोन महिन्यापूर्वी शिक्षण विभागातील एक विस्तार अधिकाऱ्याने शिक्षिकेबरोबर केलेल्या गैरवर्तनामुळे हा विभाग चर्चेत आला होता. शेवटी त्या विस्तार अधिकाऱ्याची दखल महिला आयोगाने घेतली होती. त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. आता संगमेश्वर तालुक्यातील एका शिक्षिकेने तेथील एक वरिष्ठ अधिकारी मानसिक त्रास देत असल्याची तक्रार जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये संबंधित अधिकारी विनाकारण मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद केले
आहे. दुर्गम भागांतील शाळा असून मोबाईल रेंजची अडचण असतानासुद्धा मोबाईल व्यतिरिक्त माहिती मिळू नये म्हणून जाणुनबुजून प्रयत्न केले जातात. शाळेला योजनांपासून वंचित ठेवून ग्रामस्थांना भडकविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीला पत्र दिले आहे, असे या तक्रारीत नमूद केले आहे.
शाळा इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत असून दोन शिक्षक मंजूर असूनही एका शिक्षकाची कामगिरी काढली. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी त्यांची कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी ‘माझं कोणत्याही शिक्षकांशी पटत नाही, त्या वाद करत राहतात’ असे सांगून माझी बदनामी केली असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे त्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात काही शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. त्यांच्या कारभाराबाबत चौकशी करून कारवाई करावी, असे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे.