रत्नागिरी : २ एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील ‘आस्था सोशल फाउंडेशन’ या संस्थेने मारुती मंदिर सर्कल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वमग्नता (ऑटिझम) म्हणजे काय, याची माहिती सोप्या भाषेत आणि चित्रांच्या साहाय्याने सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री. विनोद वायंगणकर यांच्या हस्ते या जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘आस्था’ संस्थेच्या सुरेखा पाथरे यांनी स्वमग्नतेची लक्षणे आणि पालकांनी आपल्या मुलांमधील या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे किती गरजेचे आहे, याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “जर मूल खूप चंचल असेल, वयानुसार बोलत नसेल, स्वतःमध्येच मग्न राहत असेल किंवा इतर मुलांमध्ये मिसळत नसेल, तर पालकांनी त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लवकर उपचार सुरू केल्यास मुलांना वयानुरूप वाढ आणि विकासाचे टप्पे गाठणे शक्य होते.”
‘आस्था’ संस्थेमध्ये अशा मुलांसाठी सर्व प्रकारचे सल्ला, समुपदेशन आणि थेरपी उपचार उपलब्ध आहेत. तसेच, जिल्हा शासकीय रुग्णालयातील डीईआयसी येथेही मुलांसाठी सेवा उपलब्ध आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
श्री. विनोद वायंगणकर यांनी ‘आस्था’ संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्वांनी या विषयाची माहिती घेऊन समाजात जनजागृती करावी, असे आवाहन केले. ‘आस्था’च्या कार्यकर्त्यांनी परिसरात माहितीपत्रके वाटून स्वमग्नता असलेल्या मुलांना स्वीकारून त्यांना आधार आणि प्रेम देण्याची गरज व्यक्त केली.
या जनजागृती कार्यक्रमात संस्थेचे कार्यकर्ते, पालक आणि मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.