चिपळूण: चिपळूण तालुक्यातील अनारी गावात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. या बिबट्याने आतापर्यंत १० ते १२ पाळीव जनावरांसह कोंबड्या फस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी पुन्हा एकदा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जनावरांचे अवशेष आढळून आले. हे अवशेष गावापासून २ किलोमीटर अंतरावर सापडले. डोंगररांगांनी वेढलेले अनारी गाव निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या गावात बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. सुरुवातीला बिबट्याने गावातील कुत्र्यांना आपले भक्ष्य बनवले, त्यामुळे गावातील कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे. त्यानंतर कोंबड्या, बकऱ्या आणि पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ले करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत १० ते १२ जनावरे बिबट्याने मारल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली आहे. काही दिवसांपूर्वी गणेशवाडी येथील शेतकरी अनंत पवार यांची म्हैस देखील बिबट्याने मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंतेत आहेत. आता वन विभाग यावर काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिपळूण : अनारी गावात बिबट्याचा धुमाकूळ, दहा ते बारा पाळीव जनावरे फस्त; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
